शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक वेळी दिवाळी आली कि मुंब्रा मधील लहानपणीच्या दिवाळीची नेहमी आठवण येते. मे महिन्याची आणि दिवाळीची सुट्टी याच काय त्या दोन मोठ्या सुट्या तेव्हा असायच्या.मे महिन्याच्या सुट्टीत तर रवानगी मामाच्या घरी होत असे पण दिवाळी मात्र भाऊबीजेपर्यन्त घरीच साजरी करत असू. दिवाळीचा अभ्यास तेव्हा सुट्टीत शाळेतून करायला दिला जायचा.आवडीने नवीन वही आणून,पहिल्या पानावर मस्त कंदीलचे चित्र काढून दिवाळी सुट्टीच्या अभ्यासाला लागायचो. सुट्टी पडल्या पडल्या अजून एक काम असायचे ते म्हणजे आंगण बनवणे, दूरच्या टेकडीवरून माती आणून आईला आम्ही देत असू, मग माती थोपटून काढत आई शेणाने सारवून मस्त पैकी अंगण तयांर करत असे.अंगण तयार झाल्यावर उरलेल्या मातीतून एक कोपऱ्यात छोटासा किल्ला सुद्धा आम्ही बनवायचो आणि एक जागा आई रांगोळीसाठी राखून ठेवायची.बाबानी बंदूक आणून दिल्यावर मग चोर पोलीस खेळ सुरु व्हायचा.चोराला शोधत शोधत नुसते आम्ही फिरत असायचो आणि घरी आल्यावर आईचे धपाटे ठरलेले असायचे.पहिल्या आंघोळीच्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहायचो.रात्री किती ही ठरवून दुसऱ्या दिवशी लवकर उठायचा प्रयत्न केला तरी जाग फटाक्याच्या आवाजानेच व्हायची.बाबांनी रात्रीच कंदील बांधलेला असायचा.पाटावर बसवून आई मस्त अंगभर सुगंधी उटणं लावायची. आईने लावलेल्या सुगंधी उटण्याच्या अंगावर गरम पाणी घेत मोरीत (बाथरूममध्ये) आंघोळ आटपायची नंतर बाहेर तुलसी समोर कारेट फोडायच. आमच्यासाठी कारेट ते सुद्धा अंगठ्याने फोडणे हा खूपच कठीण प्रकार असायचा आणि त्याची कडू चव घ्यायला लागायची. मग नवीन कपडे घालून आईने बनवलेला फराळ खायचा. चहामध्ये चकली बुडवून आणि शंकरपाळ्या चहात टाकून माझा फराळ व्हायचा आणि भल्या पहाटेच फटाके घेऊन आम्ही चाळीतले मित्र बाहेर पडायचो.चाळीत बहुतेक सर्वांच्या दारासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून झालेल्या असायच्या, मंद प्रकाशात सर्वत्र पणत्या मिणमिणतांना सुंदर दिसायच्या, प्रत्येकाच्या घरासमोर लागणारे कंदील सुद्धा आकर्षणाचे केंद्र असायचे.गल्लीत सर्वत्र उटणं आणि फराळाचा सुगंध दरवळत असायचा अश्या वातावरणात आम्ही फटाके फोडायला मैदान गाठायचो.आकाशात उडणारे रॉकेट्स मस्त वाटायचे.सापाची गोळी हा सगळ्यात अदभूत फटाका होता.हा साप फटाफट बाहेर कसा येतो याचे खूप कुतूहल वाटायचं.दिवाळीच्या सुट्टीत फुल धमाल असायची.भाऊबीजेला मग मामा काही दिवसासाठी आपल्या घरी घेऊन जायचा. मग पुन्हा सुट्टी संपत आली कि मग दिवाळीचा अभ्यास आठवायचा आणि शाळा सुरु होण्याअगोदरच्या दिवशीच तो संपायचा.

@शैलेश राणे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: