शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

......वहिनी

वहिनी अगदी पारंपारिक पद्धतीने आली आणि बोहल्यावर चढली निमूट सप्तपदी पूर्ण करून दादाचा हात धरून विना तक्रार दादाच्या साध्या घरात आली , सामावली... पण तरी माहेर काही तिचं सुटलं नाही. सासरी जे घडेल त्याच्या वरचढ तिच्या माहेरी घडलेलं असायचं. त्यात कुणाला कधी खटकलं नाही, कारण एरवी तिचं वागणं अगदी सालस आणि समजूतदार होतं.. तिचं माहेरही होतच तसं तालेवार; त्यानी हसतमुखाने मुलगी या साध्या घरी दिली ती केवळ माणसं बघूनच. त्यामुळे त्यांच्याकडूनही कधी आगाऊपणा झाला नाही की अवमान झाला नाही. वर्षातून दोनदा वहिनी माहेरी जायची . त्यात एकदा दादा तिला आणायला जायचा...हे आता आमच्या लहानपणापासून माहीत झालं होतं. ती माहेराहून आली की पुढचे काही दिवस तिच्या बोलण्यातून सतत माहेरचे वारेजंग दाखले ऐकावे लागायचे.. अर्थात ते ऐकण्यासारखेच असायचे. त्यांचा भलामोठा वाडा, त्यांची लांबचलांब पसरलेली बाग, फुलांचा ढीग, बागेशी येणारे मोर, वाट चुकून आलेली हरणं सगळंच स्वप्नवत वाटावं असं ! म्हणजे ही स्केटींग करण्यात मनमुराद वेगावर स्वार होणारी मुलगी दादाच्या सोबत इथल्या घरात स्थिरावलीच कशी? याचं आश्चर्य वाटतं. मधे तिचे भाऊ लंडनला शिक्षण पूर्ण करून आले आणि माहेरच्या गप्पा आणीकच वाढल्या... आम्हालाही ते ऐकायला आवडायचंच कारण तो परिसर, ती माणसं आम्हाला काही परकी नव्हती.. मी दहावीत नापास झालो तेव्हा आईचं काही न ऐकता वहिनी मला तिच्या माहेरी घेऊन गेली होती. म्हणाली,"आता चार दिवस माणसं येऊन उगीच भंडावून सोडतील..." चित्रपटात कसं पाहुणे आले की ती घरची बाई नोकराला सांगते- "इन्हें इनका कमरा दिखाओ.." किंवा जवळचा कोणी असेल तर "आओ, मैं तुम्हे तुम्हारा कमरा दिखाती हूँ" असं म्हणून दृश्यातून एक्झीट घेते.. पन्नाशी उलटली तरी मला या वाक्याचं अजूनही अप्रूप वाटतं.. वहिनीचं माहेरही तसंच चौसोपी होतं! त्यात वहिनी माहेरची मोठी लेक! त्यामुळे तिनेच त्या घराला एक शिस्त लावली होती.. मी वहिनीचा पाहुणा म्हणून माझीही त्या घरात खूप बडदास्त ठेवली गेली,मलाही माझी वेगळी खोली मिळाली होती. माझी "दहावी नापास होणं" एका अर्थी "सेलिब्रेट" केलं जात होतं.. म्हणजे एकूण काय अशी आमची मेघना वहिनी आणि तिचं माहेर हे आमच्या साठी एक अप्रूपच होतं.. मधल्या वर्षात दादाने पण खूप प्रगती केली. वहिनीच्या माहेराशी तुलनाच होऊ शकत नाही, पण तरी आमच्या परीने त्याने आसमान को हाथ छू लिये... पण एक जाणवायला लागलं वहिनीचं माहेराविषयी बोलणं कमी झालं. कधी बोललीच तरी त्यात पहिल्या सारखा आग्रह राहिला नव्हता. मध्ये तिच्या माहेरचा जुना वाडा पाडून त्याहून आलिशान बंगला बांधला गेला. दोन्ही भावांची आॅफिसेस बंगल्याच्या आवारातच समाविष्ट केली होती... वास्तुशांतीला मावशी सकट सगळेजण गेले होते. मलाही बोलावलं होतं पण जायला जमलं नाही. पण तिथूनच वहिनी एकदम गप्प झाली... शेवटी न राहवून मी वहिनीला विचारलंच, "म्हंटलं, हल्ली तू माहेरच्या घराबद्दल भरभरून बोलत नाहीस?" ती खिन्नपणे म्हणाली,"काय बोलू?" "काय झालं?" मी विचारलं. ती म्हणाली,"तसं पाहिलं तर काहीच झालं नाही.. सगळं रीतीला धरून झालं पण ती रीत मला मान्य करायला त्रास होतोय." क्षणभर गप्प राहून ती म्हणाली,"आम्ही मुली सासरी येऊन माहेर मनात जपत असतो. आपण आता त्या घराला परके झालो हे आमच्या लक्षातच येत नाही...आणि माहेरचे लेक परकी झाली हे गृहीतच धरून चलतात... खूप यातनामय आहे हे!" "वहिनी, नीट सांग." मी काकुळतीला येत म्हणालो.. तशी ती म्हणाली, "काही नाही रेsssss आधी वाडा होता त्यात माझी स्वत:ची खोली होती.. मला माझ्या खोलीचं कौतुक होतं. घरचेही त्या खोलीला ताईची खोलीच म्हणायचे." "मग आता?" मी नं राहवून विचारलं. "आता इतका आलिशान बंगला बांधला. एक मजला वाढवला पण त्यात मला कुठेच जागा नाही.... म्हणजे शंतनू (धाकटा भाऊ) आता दहा बारा वर्ष लंडनला जायचाय तरी त्याची रूम आहे; ...आईबाबांची रूम असूनही आईची एक वेगळी रूम आहे, दादाच्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या रूम्स .. पण ताईची जागा या घरात अबाधित आहे असं कोणालाच वाटलं नाही.. मी सहज विचारून गेले 'माझी रूम?' तर शंतनू म्हणाला,'गेस्टरूम आहे ना... शिवाय स्टडीरूम आहेच.' जागा होती पण सामाऊन घेणं जे म्हणतात ते त्यांच्या लक्षातही आलं नाही... मग मी मनापासून या घराकडे वळले या घरची होऊन गेले.. पण ही रीत मी मोडेन आपण जेव्हा बंगला बांधू. मी छकुलीचं लग्न झालं तरी तिची रूम तिला हवी तशी राखून ठेवेन... गेस्टरूम मधे पाहुणे उतरवायचे... आपल्या लेकीबाळी नाही. त्या दुसर्‍या घरी गेल्या तरी... त्या आपल्याच असतात." ......वहिनी भरभरून बोलत राहिली मी ऐकत राहिलो... - चंद्रशेखर गोखले...

उसना ऊजेड

आज मी एक गोष्ट पोस्ट करत आहे...
मनापासुन वाच... गोष्टीच नाव आहे,
"उसना ऊजेड" एका गृहस्थाकडं त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता. गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद् गृह्स्थाला कळलेही नाही. मग मित्र जायला निघताच त्यानं त्याच्या हाती कंदिल दिला आणि तो मित्राला म्हणाला,"बाहेर खुप अंधार आहे.त्यामुळे तू हा कंदील घेवुन जा."
यावर तो आंधळा मित्र आश्र्चर्यान म्हणाला, "अरे बाबा, मी तर असा ठार आंधळा आहे.मला अंधार आणि उजेड सारखेच.मला या कंदिलाचा काय उपयोग…?
"हा कंदील तुझ्या साठी नाहीच. डोळस माणसासाठी आहे.या उजेडा मुळं कुणीही वाटसरू तुझ्या अंगावर आदळणार नाही."तो सद् गृहस्थ म्हणाला.
हे आंधळ्या मित्राला पटलं. तो कंदील घेवुन चालू लागला.
मात्र थोड्याच वेळात एक माणुस त्याच्या अंगावर आदळला.संतापानं आणि आश्र्य्चर्याँन आंधळा मनुष्य ओरडला,"अरे , अरे, काय चाललंय तुझं ? माझ्या हातातला हा पेटता कंदील तुला दिसत नाही का ? " त्यावर जास्तच आश्च्यर्यान तो वाटसरू म्हणाला ," अरे भाऊ, तुझा कंदील कधीच विझून गेलाय.हे तुझ्या लक्ष्यात नाही आलं…?"
हे ऐकताच आंधळा मोठ्यानं हसला आणि म्हणाला, नाही लक्ष्यात आलं. पण आज एक गोष्ट मात्र कळला...
"उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही…"

आंतरजालावरून साभार 

रविवार, २२ फेब्रुवारी, २०१५

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या मनातल्या विचारांचं
तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं..
तिच्या प्रश्नाआधी
त्याचं उत्तर तयार असतं..

लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका
तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच
त्याचं मन कळवळतं...
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला
तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की
नेमकं तिला फूल हवं असतं..
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला
तिच्या जाणिवांचं कोंदण असतं...
तिच्या खर्चाला
त्याच्या खिशाचं आंदण असतं...
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांना
तिच्या पदराचं पांघरुण असतं..
तिच्या दुःखाला
त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं...
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी समझोता तर
कधी भांडण असतं
तो चिडला तरी
तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला
चहाबरोबर संपवायचं असतं..
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं..
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं..
एकानं विस्कटलं तरी
दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला
दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं
ते एक सुंदर स्वप्न असतं!

आंतरजालावरून साभार 

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५

आईलाही द्यावं कधी माहेरपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण
कबूल आहे तिचंच असतं घर
पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..
उठू दे तिला कधी सर्वात शेवटी
पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी
नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण
कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी
फार नाही, पुरेल तिला मदत जराशी
लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण
आईलाही द्यावं कधी माहेरपण
द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून
सांगावं मनातलं काही जवळ बसून
ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण
आई राहून सासरी लेकीला माहेर देते
पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?
जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण
मग आईला कुठलं माहेरपण?
तिला ओळखणारं तिचंच अंगण
समजुतदारपणावर विश्वासालेल मोकळेपण
शरीर मनाला विसाव्याचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?
आईलाही हवा असेल कधी विसावा
वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा
ज्या हातांना तिनेच लावलंय वळण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

आंतरजालावरून साभार 

शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

कुणावर तरी प्रेम करावे ...

"जमेल तसे प्रत्तेकाने ...
कुणावर तरी प्रेम करावे ...
कधी संमतीने ..कधी एकतर्फी ..
पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!!
प्रेम सखीवर करावे ..
बहिणीच्या राखीवर करावे ..!
आईच्या मायेवर करावे ..
बापाच्या छायेवर करावे ..!
प्रेम पुत्रावर करावे ..
जमल्यास ,दिलदार शत्रूवर हि करावे ..!
प्रेम मातीवर करावे ..
निधड्या छातीवर करावे ..!
प्रेम शिवबाच्या बाण्यावर ...
लताच्या गाण्यावर
सचिन च्या खेळावर आणि
वारकर्यांच्या टाळावर हि करावे !
प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे ..
प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!!
महाराष्ट्राबरोबरच देशावर ...
आणि ,अगदी ..न चुकता स्वतःवर ...
जमेल तसे प्रेम करावे .!!!!!!

आंतरजालावरून साभार

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

आज 'वॅलेनटाइन डे'

तो म्हणाला आज 'वॅलेनटाइन डे'
ती म्हणे, नवे काय? रोजचेच रडे
चल ना गं..
मस्त कॅण्डेललाइट डिनर घेऊ
ती म्हणे बरं..! मुलांना सोबत घेऊन जाऊ
तो लाडात.. थोडा रोमॅन्टिक !
ती मात्र जुनी.. तशीच अॅन्टिक !
त्यानं म्हटलं,
आज बायको नको गं..
तुझ्यातली प्रेयसी हवी
तिने हसत म्हणाली, तुम्हांला काय..!
रोज नवी फॅण्टसी हवी
तो म्हणाला चालेल गं,
इतकंही हसलीस तरी !
हाती हात घेऊन घटकाभर जवळ बसलीस तरी
त्याच्या स्वच्छ
नजरेला ती भुलून गेली
आणि मधाळंसं हसत पुन्हा फुलून गेली
त्याला म्हणाली..
वेड्या........!
हा 'वॅलेनटाइन डे ' फक्त
वर्षातून एकदाच साजरा होतो..
तुझ्या नजरेनं माझा चेहरा मात्र
कुठल्याही 'डे' ला लाजरा होतो..
नजरेत नजर मिसळायला
कॅण्डललाइटचं टेबल लागत नाही....
अन .......
एकरुप झालेल्या जीवांना
'वॅलेनटाइन 'चं लेबल लागत नाही"


आंतरजालावरून साभारशनिवार, ७ फेब्रुवारी, २०१५

आयुष्य कसं असतं?

मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?
पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?
पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्याला फुलविण्याचा


आंतरजालावरून साभार