आमच्या बिल्डिंग मध्ये एक गृहस्थ आहेत. ठाण्याला एका मोठ्या कंपनीमध्ये एका मोठ्या हुद्द्यावर ते काम करतात.लवकरच ते निवृत्त होणार आहेत.माझे ही ऑफिस ठाण्याला असल्यामुळे गेली दोन-तीन वर्ष मी त्यांचा दिनक्रम बघतो आहे. त्याचे ऑफिस बहुतेक सकाळी ८ वाजता असते पण ते सकाळी ६ वाजताच घर सोडतात आणि ठाणे स्टेशनसमोरील आपल्या नेहमीच्या आवडत्या स्टाॅलवर नाश्ता करतात. बरीच वर्ष ते त्याच्याकडे नाश्ता करत असल्यामुळे त्या विक्रेत्याची आणि त्याची खूप चांगली ओळख झाली आहे.हल्ली तर तो विक्रेता ते आले कि घरी जास्तीच्या नाश्त्याचे सामान आणायला जातो तेव्हा हे गृहस्थ त्याचा स्टाॅल बघतात आणि कसलाही संकोच न बाळगता येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाला हवा तो नाश्ता प्लेट मध्ये भरून देतात आणि बरोबर पैसे घेतात. विक्रेता पुन्हा आला कि त्याला सर्व हिशोब देऊन ते आपल्या ऑफिसच्या बसकडे निघतात. तसे बघाल तर ही गोष्ट खूप साधी वाटेल पण आजकाल जिथे धावपळीचे जीवन जगत असताना आनंदासाठी प्रत्येक गोष्ट मोजली जाते किंवा त्याचा काही मोबदला द्यावा लागतो तिथे अशी काही माणसे छोट्या छोट्या गोष्टी करून 'गम्मत', 'मजा', 'आनंद', 'सुख', 'समाधान' असे सर्व काही अनुभवत असतात आणि ते सुद्धा अगदी सहजच.कृपया 'किती' ते विचारू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा