मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

आम्ही शाळकरी १९९४ चौथे स्नेह संमेलन

आम्ही शाळकरी १९९४ चौथे स्नेह संमेलन.
आज सकाळी ज्या आतुरतेने मी तयारी करून माझ्या शाळेत जात होतो ते बघून माझी बायको म्हणाली " लहान होतात तेव्हा तरी अशी तयारी करून जात होतात का?" खरंच तेव्हा एवढे विशेष वाटायचे नाही.आई सकाळी सकाळी उठवून "अरे आज झेंडावंदन आहे ना?… जायचे आहे कि नाही शाळेत? म्हणून तगादा लावून शाळेत पाठवायची. त्या वेळी शाळेत जाण्यापेक्षा त्या दिवशी असणाऱ्या सुट्टीचा आनंद विशेष असायचा पण आता मात्र १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ची ओढ जास्त असते.शाळा हा माझा नेहमीचा जिव्हाळ्याचा विषय राहिला होता, आहे आणि राहणारा आहे त्यामुळे पुन्हा शाळेत येणं हे नेहमीच माझ्या साठी खूप खास असते .आज सुद्धा पुन्हा आपल्या शाळेत तसेच वर्गामध्ये बाकांवर बसून आपल्या आवडत्या शिक्षक आणि मित्रांशी केलेल्या गप्पा मस्तच वाटल्या.वयाने मोठ्या झालेल्या शरीरातल्या मनाला परत एकदा लहान व्ह्यायची संधी मिळाली.आपल्या माजी विद्यार्थ्यांना पाहून आपल्या शिक्षकांना झालेला आनंद सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांनी स्वतःहून केलेले आमचे स्वागत आणि दिलेला चहा नाश्ता त्यामुळे खंरच माझे मन खूप भरून आले.किशोर नेहमी जाता जाता एक तरी शेर किंवा कविता टाकत जा असे सांगत असतो आणि मी नेहमीप्रमाणे ते ऎकत नाही पण आज एक कविता आठवली ती खाली टाकतो आहे.
आठवला तो वर्गातला फळा,
संगतीने मग शिक्षेच्या कळा,
दाटून आला माझा गळा,
पुन्हा भेटता माझी शाळा..




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: