रविवार, १७ जानेवारी, २०१६

एका ट्रीपची गोष्ट

खर म्हणजे श्रीक्षेत्र खंडेराय, मुळगाव बदलापूर येथे जायचे नाताळच्या सुट्टीमध्येच ठरले होते पण काही कारणाने ते होऊ शकले नाही. पण २०१६च्या पहिल्या दिवशी म्हणजे , एक तारखेला काहीही करून आपण जायचचे असे मी बदलापूर मध्ये राहत असलेल्या मयुरेश देव ला सांगितले त्याप्रमाणे मी माझ्या ऑफिस/कॉलेज/शाळकरी मित्रांना विचारले "येताय का?" म्हणून. पण कोणी फारसा प्रतिसाद दिला नाही. शेवटी ३१ डिसेंबरला संध्याकाळी ट्रेकिंगची आवड असलेल्या मयुरेश पुरोला फोन केला तर त्याने प्रथम नकार दिला पण अर्ध्या तासाने परत फोन करून येतो असे म्हणाला. तसा तो सुद्धा अजून काही जणांना घेऊन येणार होता. पण १ तारखेला सकाळी तो एकटाच  ठाण्यावरून डोंबिवली मध्ये आला मग येणारी कर्जत गाडी पकडून आम्ही बदलापूर मध्ये आलो तर मयुरेश देव आधीच आमची वाट बघत होता. बदलापूर पूर्वेला एसटी ची वाट पाहत होतो तर तिथून सहा सीटर रिक्षा जाताना दिसली. आम्ही त्याला मुळगावला आम्हाला खंडोबा मंदिर येथे जायचे आहे सांगितले तर तो "चला रिक्षात बसा सोडतो " म्हणाला. जेव्हा आपण एखादी गोष्ट जिद्दीने करतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात हा अनुभव पुन्हा एकदा आला . रिक्षाने आम्हाला मुळगाव येथील मंदिरात जायच्या वाटेवर सोडले. तिथून थोडीशी पायपीट करून डोंगराच्या पायथ्याशी आलो. तिथून वर जाण्यासाठी ५०० पायऱ्या आहेत रुंदीला एक पायरी दोन पायऱ्याइतकी रुंद असल्याने चढायला थोडी दमछाक  होत होती पण सकाळच्या थंडीमुळे दमायला होत नव्हते. आजूबाजूला पक्षांचा होत असलेला किलबिलाट आणि सभोवताली दिसणारे नैसर्गिक सौंदर्य यामुळे मन प्रसन्न वाटत होते. मयुरेश देव मधून मधून दमून विश्रांती घेत होता. तेव्हा मी आणि पुरो लगेच आजूबाजूचा निसर्ग फोटो मध्ये कैद करत होतो. अर्धा तास चढून झाल्यावर शेवटी मंदिरात पोहचलो गेल्या वेळी आलो होतो तेव्हा जाधव नावाचे पुजारी होते पण आता मात्र कुणीच नव्हते. श्रीखंडोबा हे  मयुरेश पुरोचे कुलदैवत असल्यामुळे त्याने खणखणीत आवाजात खंडोबाच्या नावाने आरोळी ठोकली. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या कट्ट्यावर बसून मयुरेश देवने आणलेले लाडू खाल्ले आणि समोरचे अद्दभूत सौदर्य डोळ्यात साठवत बसलो.  मंदिराच्या परिसरातून दिसणारे बारवी धरण,कानोर गाव व सोनार गाव मस्त वाटत होते.परत खाली येताना फारसा त्रास जाणवला नाही पण भुका मात्र लागल्या होत्या. खाली आल्यावर मुरबाड रोडच्या बाजूला असलेल्या वैजयंती धाब्यावर मस्त पैकी मसालेदार मिसळ आणि वडापाव खाल्ला.वडापाव बरोबर दिलेला ठेचा सुद्धा झणझणीत होता.अश्या प्रकारे नवीन वर्षाची पहिली सकाळ सार्थकी लागली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: