बुधवार, २६ ऑक्टोबर, २०११

दिवाळीच्या दिवशी फडके रोड

जीन्स आणि टी - शर्टमध्ये वावरणारी तरुणाई पारंपारिक पोषाख परिधान करून दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडला जमायचं . मित्रमंडळींसोबत मनसोक्त भटकायचे आणि मग एखाद्या हॉटेलमध्ये जेवणावर ताव मारायचा . डोंबिवलीतील तरुणाईने दिवाळीनिमित्त एकमेकांना भेटत आनंद साजरा करत डोंबिवलीची सांस्कृतिक पताका उंचावणारी ही परंपरा राज्यभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे .

डोंबिवलीतील फडके रोड म्हणजे तरुणाई अस एक समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झाले आहे . दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान झाल्यानंतर तरुणाईची पावले वळतात ती फडके रोडकडे . पारंपारिक पोषाख परिधान करून मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी घ्यायची आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा ट्रेन्ड सुरू करण्याचा मान डोंबिवलीतल्या फडके रोडलाच द्यावा लागेल . ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली , याचे उत्तर कोणालाच देता येणार नाही . मात्र कोणतेही निमंत्रण नसताना डोंबिवलीतील तरुणाई दिवाळीच्या दिवशी फडके रोडला हमखास अवतरते . फडके रोडचे अनुकरण आता ठाणे , कल्याण आणि मुंबईतही होऊ लागले आहे 

दिवाळीच्या दिवशी फडके रोडने लग्नाच्या गाठीदेखील जुळवल्या आहेत . याच आशेने अनेक तरुण फडके रोडला ' ती ' चा शोध घ्यायला येत असल्याचे खासगीत मान्य करतात . एखाद्या नेत्याच्या सभेला होणार नाही तेवढी गर्दी दिवाळीला फडके रोडला होते . युथ आयकॉन आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही दिवाळीच्या फडके रोडला येण्याचा मोह टाळता आला नव्हता .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: